मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो... आणखी एक भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात

Foto
अहिल्यानगर : मला दैवी शक्ती प्राप्त आहे, मी मंत्रशक्तीने कॅन्सरसारखा आजार बरा करू शकतो,ङ्घङ्घ अशा गप्पा मारून भोळ्या-भाबड्या जनतेची दिशाभूल करणार्‍या संगमनेरमधील एका भोंदूबाबाचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे दत्तधाम सरकार नावाने स्वतःचा दरबार भरवणार्‍या राजेंद्र गडगे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली असून, त्याच्या लुटमारीचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

यूट्यूबच्या माध्यमातून जाळे आणि खोटे दावे
राजेंद्र बापू गडगे याने केवळ प्रत्यक्ष दरबारच नाही, तर तंत्रज्ञानाचा वापर करून दत्तधाम सरकार नावाचे यूट्यूब चॅनलही सुरू केले होते. या चॅनलवर तो बनावट व्हिडिओ टाकायचा, ज्यामध्ये मंत्रोच्चाराने असाध्य आजार बरे झाल्याचा दावा केला जात असे. ज्या महिलांना मूल होत नाही, त्यांना अपत्यप्राप्ती करून देणे, कर्करोग (कॅन्सर) समूळ नष्ट करणे आणि घरातील कौटुंबिक कलह दूर करणे अशा आमिषांना बळी पडून ग्रामीण भागातील लोक त्याच्या जाळ्यात ओढले जात होते.

हजारो रुपयांची वसुली 
हा भोंदूबाबा केवळ सल्ले देऊन थांबत नसे, तर तो श्रद्धेचा बाजार मांडून अवाढव्य रक्कम उकळायचा. समस्या निवारणासाठी तो भक्तांकडून १५ हजार, २१ हजार ते ५१ हजार रुपयांपर्यंतची रक्कम देणगी किंवा दक्षिणा म्हणून उकळत असे. गंभीर आजारांवर उपचार करण्याच्या बहाण्याने तो रुग्णांना कसलातरी पालापाचोळा औषध म्हणून द्यायचा. यामुळे आजार बरे होण्याऐवजी अनेकांना गंभीर शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचेही तपासात उघड झाले आहे.

१० वर्षांपासून सुरू होते काळे कारनामे 
गेल्या १० वर्षांपासून राजेंद्र गडगे हा व्यवसाय करत होता. या काळात त्याने शेकडो कुटुंबांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याची माहिती देखील समोर येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर संगमनेर तालुका पोलिसांनी राजेंद्र गडगेला अटक केली. पोलिसांनी मुख्य आरोपी राजेंद्र गडगे याच्यासह मधुकर शिंदे, गडगेची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी आणि सुरज शिंदे यांना अटक केलीय. 

कायद्याचा फास आवळला
आरोपींविरुद्ध केवळ फसवणुकीचाच नाही, तर अत्यंत कडक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा विरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अ‍ॅक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर अ‍ॅक्ट, आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.